ढाक्का (बांगलादेश) – बांगलादेशमधील ‘तश्नुआ आनन शिशिर’ हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. कारण, बांगलादेशच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने तश्नुआ यांना पहिला तृतीयपंथी वृत्तनिवेदक होण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
बांगलादेशातील एक पुराणमतवादी मुस्लीम कुटुंबात तश्नुवा आनन शिशिर यांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांचा स्वभाव खोडकर आणि मजेदार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, हळूहळू आपल्यातील वेगळेपणा जाणवू लागल्यानंतर कधीकधी त्यांना कोणतातरी मानसिक आजार असावा, असे अनेकांना वाटत असे. परंतु, आता त्यांचा वृत्तनिवेदिक म्हणून काम करण्यापर्यंतचा प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आणि खूप प्रेरणा देणारा आहे.
तश्नुआ एका मुलाखतीत म्हणतात की, “मला नेहमी प्रश्न पडायचा की, मी कोण आहे ? पण आता मात्र माझ्या इथपर्यंत पोहोचण्याने आता आमचंही अस्तित्व अधोरेखित होत आहे आणि याचा मला खूप आनंद आहे.” आपल्या पूर्वायुष्याबद्दल बोलताना तश्नुआ शिशिर म्हणतात, “माझा जन्म पुरुष शरीरात झाला, पण माझे हृदय व मन स्त्रीसारखे होते.” २९ वर्षीय तश्नुवा यांनी पहिला तृतीयपंथी वृत्तानिवेदक होण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.






