पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पुणे पोलीस आता गल्लीबोळात सायकलवरून गस्त घालणार आहेत. वर्दळीच्या आणि अरुंद रस्त्यांवर गस्त घालता यावी, यासाठी पुणे महानगरपालिकेकडून पोलिसांना 10 सायकली देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर समर्थ पोलीस ठाण्यांतर्गत हद्दीत सायकलवरून गस्त घालण्याच्या प्रयोगाला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस उपायुक्त सागर पाटील, भाजप सभागृह नेते गणेश बीडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम उपस्थित होते.
पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असलेल्या झोपडपट्टी परिसरात अरुंद रस्ते आणि गल्लीबोळ असते. त्यामुळे गस्त घालताना पोलिसांना वाहनांच्या वापरावर मर्यादा येतात. त्यापार्श्वभूमीवर गल्लीबोळातही पोलिसांचे पेट्रोलिंग सक्षम करण्यासाठी सायकलींचा वापर करण्यात येणार आहे.
महापालिकेकडून पुणे पोलिसांना गस्तीसाठी देण्यात आलेल्या अद्ययावत 10 सायकलींना गिअर आहेत. त्यानुसार समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी आजपासून सायकलवरून गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. दिवसासह रात्री ठरावीक वेळेत पोलीस हद्दीत सायकलवरून गस्त घालणार आहेत. सायकलवर गस्तीच्या निमित्ताने प्रत्येक पोलिसांनी दररोज काही अंतर कापल्यानंतर व्यायामाला मदत होणार आहे. त्यामुळे पोलिसांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होणार आहे.






