भीषण अपघात ठाण्यातील पोलीस कुटुंबातील तिघांचा मृत्यू

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंतजवळील कोकणगाव फाटय़ावर गुरुवारी दुपारी भीषण अपघातात ठाणे येथील एका पोलीस कॉन्स्टेबलच्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर दोन कॉन्स्टेबल जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाणे जिह्यातील शाहूनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल पंडित बाबुराव चौरे (45) हे गुरुवारी दुपारी टोयोटा कारने कल्याणहून सटाणा तालुक्यातील बाभोळणे येथे त्यांच्या मूळ गावी कुटुंबीयांसह येत होते. त्यांचे मित्र डोंगरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल संजय बागुल कार चालवीत होते. कोकणगाव फाटय़ावर दोन दिवसांपासून उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर ही कार आदळून उलटली.

त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या नाशिक-चाळीसगाव बसच्या धडकेने ती शंभर फुटापर्यंत फरफटत गेली. मयुरी पंडित चौरे (18) हिचा जागीच, वैशाली चौरे (40) यांचा रात्री व मुलगा सागर चौरे (22) याचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. पंडित चौरे व संजय बागुल यांच्यावर पिंपळगाव-बसवंत येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती हवालदार एकनाथ पवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here