पुण्यात एमपीएससी परीक्षेसाठी नेमलेले ३० कर्मचारी कोरोना बाधित

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांपैकी ३० जण कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला आहे. परंतु एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ही संख्या कमी असून, संबंधित परीक्षा केंद्रांवर अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्य लोकसेवा आयोगाकडून रविवारी (ता. २१) राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७७ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी सुमारे ३१ हजार उमेदवार असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रांवर नेमलेल्या दोन हजार सातशे कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत. सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी ३० कर्मचारी बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर २० ते ३० कर्मचारी असतील. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची केंद्रप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था नेहमीप्रमाणे असेल. त्यानुसार एका वर्गात कमीत कमी १२ आणि जास्तीत जास्त २४ उमेदवार असतील. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासून सॅनिटायझेशन करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here