नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी टाकलेला लेटरबॉम्ब राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निकामी केला. परमबीर यांनी पत्रामध्ये केलेल्या दाव्यानुसार गृहमंत्री आणि सचिन वाझे यांची फेब्रुवारीच्या मध्यात भेट झाली होती. परंतु या कालावधीत अनिल देशमुख हे नागपुरात कोरोनावर उपचार घेत होते. त्यामुळे परमबीर यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसून देशमुख यांच्या राजीनाम्याची आवश्यकता नाही, असे पवारांनी ठामपणे सांगितले.
पवारांची राष्ट्रवादी आणि आघाडी सरकारला वाचवण्याची कसरत सुरू असताना परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या भ्रष्ट कारभाराची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, परमबीर यांच्या आरोपांमुळे सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला.गृहमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपच्या नेते, खासदारांनी केली आहे.






