मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘बाजार’ असे अनेक हिट चित्रपट बॉलीवूडला देणारे ज्येष्ठ पटकथा आणि संवाद लेखक सागर सरहदी यांचे रविवारी रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते 88 वर्षांचे होते. शीव येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना बॉलीवूडकरांनी व्यक्त केली आहे.
सरहदी यांचे पुतणे रमेश तलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास सरहदी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते अंथरुणाला खिळून होते. सोमवारी दुपारी त्यांच्यावर शीव येथील स्मशानगृहात अंत्यसंस्कार करण्यात आले.
11 मे 1933 साली पाकिस्तानात जन्मलेल्या सरहदी यांचे मूळ नाव गंगासागर तलवार असे होते. पाकिस्तानच्या सीमेवर त्यांचे गाव होते. फाळणीनंतर आलेल्या रेफ्युजींमध्ये त्यांना सरहदी म्हणून संबोधले जात होते. मला भूभागावरूनच ओळखायचे असेल तर माझी खरी ओळख ही ‘सागर सरहदी’ ही आहे, असे ते सांगायचे. अशाप्रकारे गंगासागर तलवार हे नाव सागर सरहदी झाले.
सरहदी यांनी आपल्या करीअरच्या सुरुवातीच्या काळात उर्दू नाटक, लघुकथांचे लेखन केले होते. त्यांना खरी ओळख मिळाली ती यश चोप्रा यांच्या 1976 साली प्रदर्शित झालेल्या ‘कभी कभी’ या चित्रपटामुळे. या चित्रपटाचे पटकथा-संवाद लेखक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पुढे यश चोप्रा यांच्या ‘सिलसिला’ आणि ‘चांदणी’ या चित्रपटांसाठीदेखील त्यांनी संवाद लेखन केले. त्यांनी ‘नूरी’, ‘रंग’, ‘कर्मयोगी’, ‘चौरस’सारख्या चित्रपटांसाठी पटकथादेखील लिहिली होती.
1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘बाझार’ या चित्रपटाद्वारे सरहदी यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. यात नसीरुद्दीन शहा, सुप्रिया पाठक शाह, स्मिता पाटील यांची मुख्य भूमिका होती. शाहरूखचा पदार्पण असलेल्या ‘दिवाना’ आणि हृतिकचे पदार्पण असलेल्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटासाठीदेखील त्यांनी संवाद लिहिले होते.






