संसदेत घमासान; लोकसभेत शिवसेनेचा सभात्याग

नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांचे पडसाद सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. सत्तारूढ भाजप खासदार आणि केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नाहकपणे हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे गदारोळ झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार हरकत घेतली. गदारोळात राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले, तर लोकसभेत शिवसेना खासदारांनी सभात्याग केला.

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी अनिल देशमुखांचा उल्लेख वसुली मंत्री करत परमबीर सिंह यांच्या आरोपांची माहिती वाचून दाखवायला सुरुवात केल्यानंतर गोंधळ झाला. महाराष्ट्राचे गृहमंत्री वसुली करतात हे देशाने पाहिले आहे, असे जावडेकर म्हणताच त्याला शिवसेना व राष्ट्रवादी काँगेसच्या खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. जावडेकर यांच्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला. सभापती व्यंकय्या नायडू यांनी कोणतेही विधान सभापटलावर घेतले जाणार नाही, असा निर्वाळा दिला. मात्र, तरीही गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आले.

लोकसभेत सभात्याग
लोकसभेत शून्य प्रहरात अनिल देशमुखांचा मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी भाजपचे खासदार राकेश सिंग, गिरीश बापट, नवनीत राणा व पूनम महाजन यांनी केली. त्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. शिवसेना खासदारांनी जोरदार आक्षेप घेत घोषणाबाजी करत सभात्याग केला.

महाराष्ट्रावर कावळ्यासारखा डोळा ठेवून बसलेल्या भाजपाच्या लोकांना, राजकारणातील कपटनिती जी त्यांनी आजपर्यंत केली, ती यशस्वी झाली नाही. म्हणून, आता परमबीर सिंग यांना बोलतं करण्यात आलं आहे. परमबीर सिंग हा खऱ्या अर्थाने केंद्र सरकारचा बोलका पोपट आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

महाराष्ट्र खूप चांगले राज्य आहे; पण भाजपला मध्य प्रदेशाप्रमाणे ते तोडायचे आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न भाजप करीत आहे. मात्र, हे खपवून घेणार नाही, असा जोरदार हल्लाबोल पंजाबमधील लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंग यांनी लोकसभेत केला. जिथे विरोधी पक्षांचे सरकार आहेत ती जोरजबरदस्तीने पाडायची अशी दादागिरी सध्या देशात सुरू आहे. ही गेष्ट महाराष्ट्रापुरती नाही, संपूर्ण देशात हेच सुरू आहे. केंद्र सरकार संघराज्य चौकट तोडत आहे. केंद्रीय संस्था हस्तक्षेप करीत आहेत, असे रवनीत सिंग म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here