गेल्या वर्षीसारखा पुन्हा लागणार कर्फ्यू?

केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश जारी; जाणून घ्या 1 एप्रिलपासून काय असतील नवीन निर्बंध

नवी दिल्ली – गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसने भारतात याच महिन्यात शिरकाव केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बरोबर एक वर्षापूर्वी 22 मार्चला जनता कर्फ्यू लागू करत या विषाणूने पुढे काय वाढून ठेवलंय याची झलक दाखवली होती. आता वर्षभराने नेमक्या त्याच दिवशी देशात कोरोना रुग्णांची सर्वोच्च संख्या नोंदली गेली. एका बाजूला लसीकरण सुरू झाल्याचा दिलासा मिळत असतानाच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिखर गाठलं आहे आणि सर्वाधिक धोका महाराष्ट्रातच आहे. लॉकडाउन लागणार का, नवीन निर्बंध काय असतील याबाबत स्पष्ट आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केले आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी प्लॅन केंद्रीय गृहमंत्रालयाने मांडला आहे आणि त्याबाबत राज्यांना कळवण्यात आलं आहे.

मोदी सरकारने कोरोनाच्या नव्या निर्बंधांविषयी संकेत दिले आहेत. 1 एप्रिलपासून नवे निर्बंध लागू होतील आणि 31 एप्रिलपर्यंत ते असतील, असं या सूचनेमध्ये म्हटलं आहे. गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाय योजण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात यावेत, असं म्हटलं आहे. याचा अर्थ आता स्थानिक, जिल्हा, तालुका पातळीवर लॉकडाउन करण्याचा निर्णय राज्य घेऊ शकतं.

महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोनाचा उद्रेक दिसून येतो आहे. पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती शहरांमध्ये कोरोनाची उच्चांकी संख्या नोंदली गेल्याने गरज पडल्यास लॉकडाउनचा पर्याय विचारात घेऊ असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं. आता केंद्रानेही त्याला हिरवा कंदिल दाखवला आहे. स्थानिक पातळीवर कोरोनारुग्णांची संख्या लक्षात घेत कंटेन्मेंट झोन ते लॉकडाउनचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.

गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद होती. आता मात्र कुठल्याही परिस्थितीत प्रवासाचे निर्बंध नसतील, असं केंद्राने जाहीर केलं आहे. जिल्हाबंदी नसेल, राज्या राज्यांमधली प्रवासी वाहतूकही सुरू राहील, हे स्पष्ट करण्यात आलं आहे. कोणत्याही व्यवहारांवर बंदी घालण्यात येणार नाही, पण निर्बंध असतील. SOP चे पालन करून व्यवहार सुरू ठेवू शकतील, असं सांगण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here