मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले. दोन दिवसांत त्यांच्यावरही आरोप झाले. पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांच्याकडून हे आरोप झाले. डांगे यांनी फेब्रुवारीत राज्याच्या अतिरिक्त गृह सचिवांना पत्र लिहिले होते. यात परमबीरसिंग यांच्या अंडरवर्ल्डशी संबंधांचा खुलासा केला होता. त्यांनी लिहिले होते…
‘जेव्हा मी २२ नोव्हेंबर २०१९ ला ब्रीच कँडीतील डर्टी बन्स सोबो क्लब बंद करायला गेलो, तेव्हा त्याचे मालक जितू नवलानी यांनी मला धमकावले. त्याने डीजी, अँटी करप्शन, परमबीरसिंग यांच्याशी संबंधांचा हवाला दिला. त्या रात्री तेथेच चित्रपट फायनान्सर भरत शहांचा नातू यश मेहताने एका कॉन्स्टेबलशी गैरवर्तन केले. त्याबाबत गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये परमबीर पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी नवलानीविरोधात आरोपपत्र दाखल न करण्याचे आदेश दिले. त्यांची मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यासमोर मोती महल इमारतीतील फ्लॅटमध्ये नवलानीसोबत भेट झाली. हा फ्लॅट शार्दूल सिंग याने भाड्याने घेतला आहे. तो परमबीरचा भाऊ असल्याचा दावा करतो. परमबीर व नवलानी यांचे वाधवा बंधूंशीही जवळचे संबंध आहेत. त्यांना काळ्या पैशांशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. हे प्रकरण अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंधित आहे.
माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या मागील कामाबाबतही अनेक कथा समोर आल्या आहेत. त्यातील एकानुसार, परमबीर पहिल्यांदा २००८ मध्ये चर्चेत आले. तेव्हा राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते आणि परमवीर एटीएसमध्ये अतिरिक्त आयुक्त होते. तेव्हा त्यांनी मालेगाव स्फोटप्रकरणी साध्वी प्रथा ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितला अटक केली. तेव्हापासून काँग्रेस नेत्यांनी ‘हिंदू दहशतवाद’ चा मुद्दा उपस्थित केला.
दुसऱ्या कथेनुसार, भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परमबीर यांना २०१५ मध्ये ठाण्याचे पोलिस आयुक्त केले. त्या सरकारच्या कार्यकाळात त्यांनी पुण्यातील एल्गार परिषदप्रकरणी पाच आरोपींना अटक केली. तेव्हापासून भाजप नेत्यांनी ‘शहरी नक्षली’ चा मुद्दा उचलला.
तिसरी कथा, फडणवीस सरकारने २०१९ मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त संजय बर्वे यांचा कार्यकाळ तीन महिने वाढवला. तेव्हा संतापून परमबीर यांनी घरी येऊन काचेची भांडी फाेडली होती. ते सहकाऱ्यांसोबत बोलताना नेहमीच मुंबई पोलिस आयुक्त होण्याच्या इच्छेबाबत बोलायचे.






