परमबीर सिंग यांच्या याचिकेवर आज दुपारी सुप्रीम कोर्टात सुनावणी

नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकून राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टातसुद्धा धाव घेतली. परमबीर सिंगी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आजच सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या याचिकेकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

मुंबईत स्फोटकांनी गाडी सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. त्यामुळे दुखावलेल्या परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यावर परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर 26 मार्च रोजी सुनावणी होणार होती. पण, याचिकेवर लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती करण्यात आली.

त्यामुळे आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती संजीव रेड्डी आणि न्यायमूर्ती कौल या द्विसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यासाठी सांगितले होते.हे एक मोठं षड्यंत्र आहे, पोलीस विभागाला खंडणी मागायला लावणं याला तर माफीच असू शकत नाही. सुप्रीम कोर्ट पुराव्याच्या आधारे निर्णय करेल’, असं म्हणत परमबीर सिंह यांनी ही याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here