ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – 20 मार्च रोजी एका 40 वर्षीय महिलेच्या झालेल्या हत्येने उल्हासनगर शहर हादरले होते. आईची हत्या झाल्याने 15 वर्षांची मुलगी आईच्या मायेला पोरकी झाली होती. या हत्येप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. ही हत्या कोणी आणि कोणत्या उद्देशाने केली असेल याचा पोलीस शोध घेत असतांना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे हत्या झालेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या आईची तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याचे समोर आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आई केवळ आपल्या प्रेमाला विरोध करते आणि प्रियकराला घरी येण्यास मज्जाव करते यामुळे ही हत्या झाल्याचे समोर आले आहे.
उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 4 च्या 26 सेक्शन परिसरातील एका महिलेचा तिच्या घरातच रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडला होता. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी मृत महिलेच्या घरात शिरून तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर सपासप वार करत तिची गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. अशा वेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी तांत्रिक आधारावर अल्पवयीन मुलीच्या तीन मित्रांना ताब्यात घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
या तिघांपैकी जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या आरोपी दिलजित यादव याच्याशी अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. त्याला मृत महिला विरोध करत होती. त्यामुळे मुलीने प्रियकर दिलजीत यादवच्या मदतीने आईला संपवण्याचा निर्णय घेतला. आई घरी एकटीच असल्याने त्याने प्लॅनिंग केली होती. आरोपी प्रियकराने ठरल्याप्रमाणे दिलजित याने महिलेची राहत्या घरात हत्या केली. आणि तो पसार झाला.
दरम्यान काही वेळाने घरात मृतदेह असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करीत सखोल तपास सुरू केला. त्याच रात्री शोध मोहीम राबवून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीतून हा सगळा प्रकार समोर आला. या हत्येप्रकरणी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचाही सहभाग असल्याने तिला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर आज मुख्य आरोपीला न्यायालयात हजर केले असता 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे






