तेलंगणामध्ये कबड्डी सामन्यादरम्यान गॅलरी कोसळली; 50 जखमी

हैदराबाद – तेलंणाच्या सूर्यापेट जिल्ह्यात कबड्डी सामना सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत 50 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. सामना सुरू असतानाच लाकडाच्या फळ्यांपासून तयार करण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. दुघटनेनंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्यापेट जिल्ह्यात तेलंगणा कबड्डी असोसिएशनतर्फे सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रेक्षकांना बसण्यासाठी लाकडाच्या फळ्यांनी तयार केलेली गॅलरी उभारण्यात आली होती. मात्र क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक जमा झाल्याने वजनामुळे गॅलरी कोसळली. त्यात 50 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक त्यांना पुढील उपचारांसाठी हैदराबाद येथे पाठवण्यात आले आहे.

सूर्यापेट जिल्ह्यात सध्या 47 वी राष्ट्रीय कनिष्ठ कबड्डी स्पर्धा सुरू असून 29 राज्यांतील खेळाडू त्यात सहभागी झाले आहेत. पंधरा हजार प्रेक्षक बसू शकतील अशा तीन लाकडी गॅलरी त्यासाठी उभारण्यात आल्या आहेत. प्रत्येक गॅलरीची क्षमता पाच हजारांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here