फडणवीसांच्या ‘त्या’ अहवालाला काडीचीही किंमत नाही – संजय राऊत

नवी दिल्ली – माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते यांनी दिल्लीमध्ये गृहसचिवांची भेट घेऊन फोन टॅपिंग अहवाल सादर केला आहे. दरम्यान या भेटीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, फोन टॅपिंग अहवाल हा भिजलेला फटका आहे. त्यामुळे ‘त्या’ अहवालाला काडीचीही किंमत नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला. दिल्लीत ते आज पत्रकारांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले, दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्याने यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचे स्वागत करायला हवे. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले अशा बातम्या पाहिल्या. तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. तसेच तो अहवाल त्यांनी जाहीर करावा, त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.

काही चुकीचे झाले असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम आहे, त्यासाठी केंद्रात येण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा करावी, असे सांगून विरोधकांचा नवा सिनेमा कुठला याकडे आता आमचे लक्ष आहे, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.
परमबीर सिंह यांच्याच आग्रहाखातर आपण राज्यात महाराष्ट्रात सीबीआयवर बंदी घातली. आता तेच परमबीर सिंह सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी आज राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. याबाबत बोलताना राऊत म्हणाले, कोश्यारी आज राज्याचे राज्यपाल आहेत. कालपर्यंत संघ प्रचारक होते. राज्यपालांना चांगली प्रतिमा हवी असेल तर त्यांनी संविधानानुसार कामं करावीत.

बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. बंगालमध्ये खेला होबे सुरू आहे. तसेच महाराष्ट्र आणि दिल्लीत खेला होबे सुरू आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे मनोरंजन चांगले होत आहे. त्यावर मनोरंजन टॅक्सही देण्याची गरज नाही. टॅक्स फ्री आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here