जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कला चित्रपट व सांस्कृतिक विभाग जळगाव जिल्हा व जळगाव शहर यांच्या संयुक्तविद्यमाने कलाकारांच्या समस्यांचे निराकरण व्हावे याकरिता एक हक्काचे व्यासपीठ उभे करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कला चित्रपट व सांस्कृतिक विभाग जळगाव जिल्हा व जळगाव शहर प्रमुख सल्लागार पदी ज्येष्ठ कलावंत व दिग्दर्शक रमेश भोळे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी अध्यक्ष अभिषेक पाटील, महिला सरचिटणीस जयश्री पाटील, चित्रपट कला सांस्कृतिक विभाग जळगाव जिल्हा अध्यक्ष गौरव लवंगे तसेच इतर जळगाव महानगर मान्यवर उपस्थित होते.
रमेश भोळे हे जळगावच्या सांस्कृतिक क्षेत्रातील अनुभवी रंगकर्मी असून, त्यांनी जळगावसह मुंबईतदेखील नाटक, चित्रपट, दूरचित्रमालिकातून कामे केली आहेत. १९८९ साली जळगावातून मुंबईला गेल्यानंतर त्यांनी मृगनयनी या दूरचित्रवाहिनी मालिकेला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटांना दिग्दर्शकीय समूहात काम केले असून, जळगावात त्यांची ओम थिएटर्स म्हणून संस्था आहे.
राज्यनाट्य व कामगार नाट्य स्पर्धेत सातत्याने सादरीकरण करुन या संस्थेने अनेक पारितोषिके मिळविलेली आहेत. राज्यनाट्य स्पर्धेत एकाच वर्षी एकाच संस्थेच्या पाच नाटकांचा प्रयोग करण्याचा विक्रम ओम थिएटर्सच्या नावे आहे.
रमेश भोळे यांच्या रुपाने अनुभवी, जाणत्या कलावंताची प्रमुख सल्लागारपदी नेमणूक झाल्याने, जळगाव जिल्ह्यातील रंगकर्मींच्या अनेक समस्या सुटतील. त्यांच्या या निवडीबद्दल जळगाव जिल्ह्यातील समस्त रंगकर्मींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






