मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार यांवर नवीन निर्बंध
नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – मागील काही दिवसांपासून कोव्हीड-19 बाधित रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेऊन कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पुन्हा अधिक प्रभावीपणे “मिशन ब्रेक द चेन” राबविण्यात येत आहे. यादृष्टीने विविध उपाययोजना करताना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार अशा गर्दीच्या संभाव्य ठिकाणी कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन व्हावे व कोव्हीड प्रादुर्भावाला प्रतिबंध व्हावा यासाठी नवीन निर्बंध जाहीर केले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेने तसेच नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत कोरोनाचा बऱ्यापैकी सामना केला होता. यानंतर नवी मुंबईतील कोरोनाच्या आकडेवारीत उतार झालेला पाहायला मिळत होता. मात्र यानंतर नागरिकांनी बेजबाबदारपणे वागण्यास सुरुवात केली असल्याचे नवी मुंबईत पाहायला मिळत आहे. महानगपालिकेच्या कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचा आवाहनाला नागरिकांनी आवश्यक प्रतिसाद न दिल्याने आयुक्त अभिजित बांगर यांनी राज्य सरकारच्या आवाहनानुसार नवी मुंबईत देखील काही निर्बंध घातले आहेत. यामध्ये मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार अशा गर्दीच्या संभाव्य ठिकाणी कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत नियमावली नुकतीच आयुक्तांनी जाहीर केली आहे.
दरम्यान, यापेक्षा अधिक तीव्र निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकाने घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत न चुकता मास्कचा वापर करावा व प्रत्येक ठिकाणी सुरक्षित अंतराचे भान राखावे तसेच शक्य होईल तितक्या वेळा हात धुवावेत अथवा सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
निर्बंध पुढीलप्रमाणे :-
• शॉपींग मॉल्सच्या प्रत्येक प्रवेशव्दारावर (Entry Point) दर शुक्रवारी सायंकाळी ४.०० नंतर तसेच शनिवार आणि रविवार पूर्ण वेळ मॉलमध्ये प्रवेश करतेवेळी कोव्हीड चाचणी (Rapid Antigen Test) करणे बंधनकारक असणार आहे. कोव्हीड चाचणीचा अहवाल निगेटीव्ह असेल तरच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल किंवा मॉलमध्ये येणाऱ्या अभ्यागताने मागील ७२ तासांमधील कोव्हीड चाचणी (RT-PCR) अहवाल निगेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
• शॉपींग मॉलमध्ये योग्य सामाजिक अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये ५०,०००/- इतका दंड मॉल व्यवस्थापनाकडून आकारण्यात येईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व तिसऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास शॉपिंग मॉल पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.
• डि मार्ट, रिलायन्स फ्रेश, स्टार बाजार यांसारख्या Convenience Stores / Departmental Stores मध्ये एका वेळी किती अभ्यागत स्टोअरमध्ये उपस्थित राहू शकतील याचा आराखडा तयार करुन त्यानुसार टोकन प्रणाली सुरु करण्यात यावी.
• या स्टोअर्समध्ये योग्य सामाजिक अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये ५०,०००/- इतका दंड संबंधित स्टोअर्सच्या व्यवस्थापनाकडून आकारण्यात येईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व तिसऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास स्टोअर पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.
• कोव्हीड-19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी उद्यानांमधील ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहित्य हे पूर्णत: बंद राहतील व त्यांचा वापर करता येणार नाही.
• त्याचप्रमाणे सर्व उद्याने सकाळी ५.३० ते सकाळी १०.०० या वेळेव्यतिरिक्त इतर संपूर्ण वेळ बंद राहतील.
• दैनंदिन व आठवडी बाजारामध्ये मास्क, सुरक्षित अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाणे अनिवार्य आहे.






