सचिन वाझे दहशतवादी;‘एनआयए’ची ‘यूएपीए’ अंतर्गत कारवाई

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – ‘ऍण्टेलिया’ प्रकरणात सचिन वाझेचे पाय आता अधिकच खोलात गेले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱया ‘एनआयए’ने आज वाझेवर गैरकायदा कृत्य प्रतिबंधक अधिनियम (यूएपीए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांसाठी ‘यूएपीए’ या कायद्यातील कलमे लावली जातात. त्यामुळे ‘एनआयए’ने एका परीने सचिन वाझे याला दहशतवादीच ठरवले आहे.

जिलेटीनच्या कांडय़ा असलेली स्कॉर्पिओ वाझेने ‘ऍण्टेलिया’जवळ का ठेवली होती याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही. मात्र हे कृत्य दहशतवादी असल्याने एनआयएने अखेर त्याची गंभीर दखल घेतली. गेल्या दहा दिवसांपासून एनआयएचे पथक या प्रकरणात सचिन वाझेची कसून चौकशी करीत आहे, परंतु वाझेकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यातच वाझेची कोठडी गुरुवार, 25 मार्च रोजी संपत असल्याने बुधवारीच एनआयएने वाझेवर ‘यूएपीए’ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याचे एनआयएच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास तत्काळ थांबवा असे आदेश ठाणे कोर्टाने बुधवारी एटीएसला दिले. हा तपास आता एनआयएकडे सोपवा, असेही कोर्टाने सांगितले. एटीएसने ताब्यात घेतलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर यांची कस्टडी एनआयएने घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here