भांडुपमधील ड्रिम्स मॉलमधल्या सनराईज हॉस्पिटलला आग

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – भांडुपमधील ड्रिम्स मॉलमधील सनराईज हॉस्पिटलला गुरुवारी उशीरा रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने अग्निशमनदलाने वेळीच बचाव कार्य सुरू केल्याने रुग्णालयातील 76 रुग्णांना व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या रुग्णांतील बहुतांश रुग्ण हे कोरोनाचे असून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

भांडूप स्टेशनजवळ असलेल्या ड्रिम्स मॉलमध्ये रात्री साडे बाराच्या सुमारास आग लागल्याचा कॉल अग्निशमन दलाला आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 23 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग मॉलमधील हॉस्पिटलला लागली होती. रुग्णालयातील दोन जणांचा मृत्यू झाला. तर सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.

दरम्यान हॉस्पिटलला आग लागल्याचे समजताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. ‘मी पहिल्यांदाच एका मॉलमध्ये हॉस्पिटल बघितले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.’ असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here