औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या होळी व धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील कैकाडी मोहल्ला भागात पाच हातभट्टी दारुच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे मारून 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल नाश करण्यात आला. ही कारवाई आज 26 मार्चच्या भल्या पहाटे कैकाडी मोहल्ल्यात केली.
होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभुमीवर जालना शहरात अवैध देशी, विदेशी व गावठी हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांनी सुचना दिल्या होत्या. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील छापा मारण्यासाठी पोलीस अधिकारी अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आलेले आहे. आज 26 मार्च रोजी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जालना शहरातील वैâकाडी मोहल्ला भागात इसम व महिला या वेगवेगळ्या ठिकाणी भट्टी लावून गावठी हातभट्टीची दारु तयार करुन चोरटी विक्री करीत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.
त्यावरुन पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पहाटे एकच वेळी कैकाडी मोहल्ला भागात पाच ठिकाणी छामा मारला असता आरोपी महादु शामराव गायकवाड, किसन भानुदास गायकवाड, लक्ष्मण भगवान जाधव, रवि भगवान जाधव तसेच एक महिला हे त्यांच्या घराच्या आजुबाजुच्या हातभट्टी दारुच्या भट्ट्या लावून गावठी हातभट्टी दारु तयार करतांना मिळून आल्या. पाचही ठिकाणी पाहणी करता लोखंडी व प्लॉस्टीकच्या ड्रममध्ये गुळ मिश्रीत उग्र वास येत असलेले रसायन मिळून आले. तसेच गोणीमध्ये नवसागर व तुरटी गावठी दारु तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ, तयार हातभट्टीची दारु मिळून आल्याने ते जागीच नाश करण्यात आलेले आहे.
गावठी हातभट्टी दारुचे सेवन केल्याने मानवी जिवीतास धोका निर्माण होईल हे माहिती असतांना देखील सदर इसम व महिला यांनी स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता गावठी हातभट्टीची भट्टी लावून गावठी दारु तयार करतांना मिळून आले. या चार इसम व एका महिला यांच्या कडील रसायन, साहित्य, गावठी हातभट्टी दारु असा एकुण 2 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल नाश करण्यात आला आहे. त्यांच्याविरुध्द कदीम जालना पोलीस येथे वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.






