पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – गर्लफ्रेंडशी लगट करण्याचा प्रयत्न करून तिला मारहाण करणाऱ्या बॉयफ्रेंडला सिंहगड पोलिसांनी अटक केले आहे. अक्षय अशोक अर्जुन (27, रा. चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी अक्षय एकाच कंपनीत कामाला असताना त्यांच्यात प्रेम झाले. त्यानंतर काही दिवसांनंतर दोघांमध्ये कुरबुरी वाढल्याने तरुणीने अक्षयसोबत संपर्क कमी केला. त्यानंतर ते वेगवेगळ्या कंपनीत काम करीत होते. दरम्यान, काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तरुणी कामावर जाण्यासाठी धायरीतील बसस्थानकावर उभी होती. त्यावेळी अक्षय तिच्याजवळ जाऊन लगट करण्याचा प्रयत्न करत होता.
तू माझ्याशी बोल, मला एक संधी दे, तू पोलीस चौकीत का जात आहेस, असे म्हणत अक्षयने तिचा हात पकडला. त्यानंतर तरुणीने अक्षयला मला तुझ्यासोबत बोलायचे नाही आणि रिलेशनही ठेवायचे नाही असे उत्तर दिले. त्यामुळे रागावलेल्या अक्षयने तरुणीला भररस्त्यात मारहाण करून तिचा गळा दाबला.
त्यानंतर तरुणीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली आहे. तरुण-तरुणी एकाच कंपनीत कामाला असल्यापासून प्रेम झाले होते, मात्र काही कारणावरून तरुणाने तरुणीला मारहाण केल्यामुळे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रतिभा तांदळे यांनी दिली आहे.






