हॉटेल क्वारंटाइनचा नियम मोडून फिरणाऱ्या नऊ जणांवर गुन्हा दाखल

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – परदेशातून आल्यामुळे हॉटेल क्वारेंटाइन असतानाही बिनधास्तपणे फिरणाऱया 9 जणांसह हॉटेचा मालक-चालक अशा 15 जणांवर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व प्रवासी परदेशातून आल्यानंतर विमानतळावर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती, मात्र त्यांना हॉटेलमध्ये राहणे बंधनकारक होते. असे असतानाही ते रस्त्यावर फिरत होते.

वाढणारा कोरोना आणि परदेशातील कोविड विषाणुच्या दुसऱ्या स्ट्रेनच्या भितीमुळे परदेशातून आलेल्या प्रवाशांना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरी सात दिवस हॉटेल क्वारेंटाइन आणि सात दिवस होम क्वारेंटाइन राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र काहीजण क्वारेंटाइनचे नियम मोडून बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेकडून आणि पोलीस कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र अजूनही अनेक जण बेजबाबदारपणे फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

क्वारंटाइनमधील सर्व जण 20 ते 23 मार्चदरम्यान परदेशातून विमानाने मुंबईत आले होते. त्यांना विलगीकरणासाठी चेंबूर येथील मानस रेसिडन्सी हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. यामध्ये पुण्यातील सर्व प्रवाशांच्या विलगीकरणाचा कालावधी शुक्रवारीच संपणार होता. मात्र सकाळीच पालिकेचे पथक हॉटेलमध्ये गेले असताना क्वारेंटाइनमधील सर्वजण या ठिकाणी आढळले नाहीत.

त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन या नऊ प्रवाशांसह हॉटेलचे मालक प्रकाश भंडारी, चालक सिद्धार्थ नूलकर यांच्यासह कर्मचाऱ्यांविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here