बनावट सही करून नगरमधील महाराष्ट्र बँकेला लावला 5 कोटींचा चुना

अहमदनगर – एखाद्या सामान्य माणसाची फसवणूक होणं सध्या फारच सामान्य झालं आहे. फसवणूक करणारे भामटे ऑनलाइन फ्रॉड, खोट्या स्कीम असा कोणत्याही प्रकारचा बनाव करून लोकांना लुबाडतात. मात्र अहमदनगरमधून एक धक्कादायक बाब समोर आली आली आहे. याठिकाणी कुणा सामान्य व्यक्तीला नाही तर थेट बँकेला चुना लावण्यात आला आहे. महाराष्ट्र बँकेला 5 कोटींपेक्षा जास्त रक्कमेची या घटनेत फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेत मंडळाधिकारी, तलाठी यांच्यासह एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांनी बनावट लेटरहेडचा वापर केला. त्यांनी त्यावर बनावट सही शिक्का देखील मारला. महाराष्ट्र बँकेच्या सावेडी शाखेत ही घटना घडली. बँकेच्या या शाखेची एकूण 5 कोटी 1 लाख 84 हजार 614 रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणात मंडळाधिकारी जगन्नाथ धसाळ, सावेडीचे तलाठी हरिचंद्र देशपांडे, नागापूरचे तलाठी संदीप तरटे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार साधारण 28 ऑगस्ट 2020 ते 29 नोव्हेंबर 2020 या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला होता.

मवाळ इन्फ्रास्ट्रक्चर अॅग्रो आर अँड डी सेंटर अँड सोल्युशनचे भागीदार अशोक मदनलाल मवाळ, पंकज अशोक मवाळ, भरत अशोक मवाळ, मृदुल अशोक मवाळ (सर्व राहणार भिस्तबाग, नगर), मंडळाधिकारी जगन्नाथ गोरक्षनाथ धसाळ, सावेडीचे तलाठी हरिचंद्र विजय देशपांडे, नागापूरचे तलाठी संदीप किसन तरटे अशी गुन्हा दाखल झालेल्या सर्व आरोपींची नावं आहेत.

मवाळ इन्फ्रास्ट्रक्चर अॅग्रो आर अँड डी सेंटर अँड सोल्युशनचे महाराष्ट्र बँकेच्या सावेडी शाखेत कॅश क्रेडीट कर्ज खाते आहे. मवाळ इन्फास्ट्रक्चरचे भागीदार अशोक मवाळ, पंकज मवाळ, भरत मवाळ आणि मृदुल मवाळ यांच्या मालमत्तेवर कर्जाचा बोजा असताना त्यांनी बँकेचे वित्तीय नुकसान करण्यासाठी तसंच, अप्रामाणिक हेतूने बँकेची फसवणूक केली. यासाठी 21 ऑगस्ट 2020 रोजी त्यांनी सावेडी शाखेतील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी बनावट लेटरहेडवर बनावट सही शिक्का मारून 27 ऑगस्ट 2020 रोजी सावेडी आणि नागापूर तलाठी कार्यालयाकडे लेटरहेड सादर केले.

मंडळाधिकारी जगन्नाथ धसाळ, सावेडीचे तलाठी हरिचंद्र देशपांडे, नागापूरचे तलाठी संदीप तरटे यांना हाताशी धरून बँकेकडील तारण मालमत्तेचा बोजा कमी करण्यासाठी बनावट लेटर हे खरे आहे, असे भासविले. मंडळाधिकारी, तलाठी यांच्याकडून फेरफार बेकायदेशीपणे मंजुर करून घेत बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here