धौलपूर (राजस्थान) – खरंतर शाळेत शिकत असताना विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडत असतात. हे प्रश्न शिक्षकांना विचारल्यानंतर त्यांच्या प्रश्नांच निरसन होणं आवश्यक असतं. पण एका सरकारी शाळेत विचित्र प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षिकेला प्रश्न विचारला म्हणून संतापलेल्या शिक्षिकेनं संबंधित विद्यार्थीनींना चप्पलेने मारहाण केली आहे. शिक्षिकेनं चपलेने मारल्यानंतर काही विद्यार्थींनीने चाइल्ड हेल्पलाइनकडे तक्रार दाखल केली, त्यानंतर या घटनेला वाचा फुटली आहे. याप्रकरणी बाल कल्याण समितीने चौकशीचे आदेश दिले आहेत.
संबंधित घटना ही राजस्थानातील धौलपूर जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील आहे. अगोदर सरकारी शाळांकडे पालकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असताना. ही घटना घडल्याने सरकारी शाळेतील असुरक्षिता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. याप्रकरणी बाल कल्याण समितीचे सदस्य गिरीष गुर्जर यांच्या आदेशानंतर चाइल्ड हेल्पलाइनच्या टीमने संबंधित विद्यार्थींनीचं समुपदेशन केलं आहे. तसेच याप्रकरणी बाल कल्याण समितीने चौकशीचे आदेश दिले आहेत. परंतु प्रश्न विचारल्यामुळे शिक्षिकेनं विद्यार्थीनींना मारहाण केल्याच प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाचे उच्च अधिकारी संबंधित शाळेत पोहचले आहेत. मुख्य जिल्हा शिक्षणाधिकारी सियाराम मीणा यांनी शाळेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुली, आरोपी शिक्षिका आणि सर्व कर्मचार्यांचे जबाब नोंदवले आहेत. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळा प्रमुख आणि इतर कर्मचार्यांकडूनही माहिती गोळा केली आहे. शिक्षण विभागाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मुख्य जिल्हा शिक्षणाधिकारी सियाराम मीणा यांनी हे प्रकरण खोटं असल्याचं म्हटलं आहे. परंतु काही मुलींनी तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जाईल, असंही ते म्हणाले आहेत.
दुसरीकडे, बाल कल्याण समितीचे सदस्य गिरीश गुर्जर यांनी सांगितलं की, समुपदेशन करताना मुलांची लेखी तक्रार प्राप्त झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक संबंधित प्रकरण दाबण्यासाठी खोटं बोलत आहेत. त्यामुळे मुलांचं हित लक्षात घेवून संबंधित घटनेची माहिती जिल्हाधिकारी राकेश कुमार जायसवाल यांनाही देण्यात आली आहे. ते पुढे म्हणाले की, घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शिक्षणाधिकारी यांना कारवाई करण्याबाबत पत्र लिहिलं जाईल. त्यानंतर दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.






