कानपूर (उत्तरप्रदेश) – उत्तर प्रदेशमध्ये एका रुग्णालयात भीषण आग लागली. या अपघातात 2 रुग्णांचा मृत्यू झाला असून 147 रुग्णांना वाचवण्यात यश आले आहे. सर्व रुग्णांना दुसर्या इमारतीत हलवण्यात आले असून खिडक्यांच्या काचा तोडून रुग्णांना बाहेर काढण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील कार्डियोलॉजी रुग्णालयात भीषण आग लागली. जेव्हा आग लागली तेव्हा आयसीयू आणि सामान्य कक्षात 140 रुग्णांवर उपचार सुरू होते. आग लागल्यानंतर रुग्णालयातील खिडक्यांच्या काचा तोडून रुग्णांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या अपघातात दोन रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
सदर रुग्णांचा मृत्यू या अपघातात झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एका रुग्णांचा मृत्यू सकाळी सातच्या सुमारास झाला तर दुसर्या रुग्णाचा मृत्यू साडे नऊच्या सुमारास झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली असून दुर्घटनेचा चौकशी अहवाल मागितला आहे.






