सिव्हील हॉस्पिटलवरील ताण कमी करण्यासाठी ई.एस.आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मधील कोव्हिड सेंटर तात्काळ सुरु करण्यात येण्याची मागणी
सोलापूर (तालुका क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – आज दि. 29 मार्च 2021 रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सिव्हील हॉस्पिटलमधील कोव्हिड व नॉनकोव्हिडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून तेथील रुग्णांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

गेल्या वर्षी संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. त्यामुळे सोलापूर शहरात सुध्दा कोव्हिड- 19 रुग्णांचे प्रमाण वाढले होते. परंतू दरम्यानच्या काळामध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ई.एस.आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मधील कोव्हिडचे सेंटर बंद करण्यात आले होते. परंतू गेल्या महिन्यापासून सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात कोव्हिड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे शासकीय श्री. छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे कोव्हिड व नॉनकोव्हिडच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे तेथे मुबलक बेडची व्यवस्था नाही. यामुळे सदर रुग्णांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होत आहे.

याकरीता सोलापूरातील बंद असलेले ई.एस.आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटलमधील कोव्हिड- 19 सेंटर तात्काळ सुरु करणे अत्यंत आवश्यक आहे. याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री. छ. शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील ताण कमी करण्यासाठी ई.एस.आय. हॉस्पिटल व रेल्वे हॉस्पिटल मधील कोव्हिड सेंटर तात्काळ सुरु करण्यात यावे याबाबत मा. जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे मागणी केलेली आहे.






