नालासोपारा येथे सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – २० ते २५ वयोगटातील तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह भरलेली सुटकेस सापडल्याने नालासोपारा शहरात खळबळ माजली आहे. तुळिंज पोलिसांना माहिती मिळताच मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तुळिंज पोलिसांनी हत्या आणि हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तरुणीची अद्यापपर्यंत ओळख पटली नसून आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

तुळिंज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मधुकर आरुडे (४०) हे रविवारी रात्री श्रीरामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत गस्त घालत होते. त्या वेळी नालासोपारा स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर श्रीरामनगर येथील जय माँ शेरावाली पान भंडार दुकानाच्या समोर २० ते २५ वयोगटातील तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह काळ्या रंगाच्या बॅगमध्ये भरलेला सापडला. त्यांनी याची माहिती तुळिंज पोलीस ठाण्याला देताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

या तरुणीची हत्या ही २४ ते ४८ तासांच्या दरम्यान झाली असून चेहरा पूर्णपणे विद्रूप केल्याने ओळख पटविण्यासाठी पोलिसांना अडचण निर्माण झाली आहे. या महिलेची हत्या कोणी व का केली? याचा शोध तुळींज पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here