पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – समाजात बदनामी केल्याने पुण्यातील शुक्रवार पेठेतील गाडीखाना येथील आरोग्य केंद्रातच एकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 24 मार्चला सकाळी घडली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. विजयानंद तांदळे (रा. किरकटवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा यश तांदळे ( 24, रा. किरकटवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून धनंजय नानासाहेब घुले (रा. फुरसुंगी) याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयानंद तांदळे आणि संशयीत आरोपी धनंजय घुले मित्र असून गाडीखाना येथील आरोग्य केंद्रात कामाला होते. दोघांमध्ये आर्थिक देवाण घेवाणीचे व्यवहार झाले होते. घुले याने तांदळे यांच्याकडून 15 लाख रूपयांचा धनादेश घेतला होता. त्यानंतर घुलेने तांदळे यांची समाजात बदनामी केली. त्यामुळे तांदळे यांनी मृत्यूपूर्व चिठ्ठी लिहून 24 मार्चला गाडीखाना येथील कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केली. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पांढरे करत आहेत.






