‘रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण’ – ना.केदार

मुंबई (हितेश मिस्त्री) – पश्चिम महाराष्ट्रात दूध दराचा प्रश्न पेटला आहे. गायीच्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी पहाटेपासूनच तीव्र आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाना परिसरातील टिटवे येथे गोकुळ दूध संघाचा टेम्पो अडवून हजारो लिटर दूध कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ओतून दिले. सांगली जिल्ह्यातही एक टँकर अडवून हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडले. या पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी, रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
सुनील केदार म्हणाले, की ‘दूध दर प्रश्नावर मंत्रालयात आज दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करणे दुर्भाग्यपूर्ण आहे. कोरोनाच्या लढाईत गोरगरिबांना दूध वाटप करा. दुधाचे दर घटल्यामुळे दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंत्रालयात ही बैठक होणार आहे.’ पाच वर्षे सत्तेत असताना भाजपने दूध दरावर काय केलं? असा प्रश्न सुनील केदार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. दूध दराबाबत केंद्र सरकारने हातभार लावावा, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here