मुंबई (हितेश मिस्त्री) – शेतकऱ्यांचे संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा यासाठी छावा संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच दुधात ठेवले आहे. याचा व्हिडिओ छावा संघटनेच्या प्रमुखांकडून ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज दूधदर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे.
दरम्यान, छावाप्रमुख धनंजय जाधव यांनी संकट जावे म्हणून पुर्वी देव पाण्यात ठेवले जायचे आता शेतकऱ्यांचे संकट कमी होऊन दुधाला भाव मिळावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपणास आम्ही छावा संघटनेने दुधात ठेवले आहे. असे सांगत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अशी मागणी छावाप्रमुख जाधव यांनी केली आहे.
दूध दरवाढीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. कुठे रस्त्यावर दूध ओतलं जात आहे तर कुठे देवाला किंवा दगडाला अभिषेक घातला जात आहे. त्यातच छावा संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच दुधात ठेवले आहे. ही अशी राज्यातील पहिलीच घटना असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.







