अहमदाबाद – गुजरातमधील बहुचर्चित इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी CBI कोर्टाने क्राइम ब्रांचचे तीन अधिकारी गिरीश सिंघल, तरुण बारोट आणि अंजू चौधरी यांची निर्दोष सुटका केली आहे. कोर्टाने म्हटले की, इशरत जहां, लश्कर-ए-तैयबाची दहशतवादी असल्याच्या गुप्त रिपोर्टला नाकारता येत नाही. यामुळेच या तीन अधिकाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे.
2004 नंतर गुजरात सरकारने IPS जीएल सिंघल, रिटायर्ड DSP तरुण बारोट आणि असिस्टेंट सब-इंस्पेक्टर अंजू चौधरी यांच्या विरोधात इशरत जहां एनकाउंटर प्रकरणी कारवाई करण्यास नकार दिला होता. बुधवारी या प्रकरणी दाखल अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणी कोर्टाने म्हटले की, इशरत जहां दहशतवादी असल्याचे पुरावे आहेत. त्या तीन अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन केले.

15 जून, 2004 ला अहमदाबादमधील कोतरपुर वॉटरवर्क्सजवळ पोलिस एनकाउंटरमध्ये इशरत जहां, जावेद शेख, अमजद राम आणि जीशान जौहर ठार झाले होते. गुप्त माहितीनुसार, हे सर्वजण लश्कर-ए-तैयबाशी संबंधित होते आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी आले होते.
या एनकाउंटरनंतर इशरत जहांची आई समीमा कौसर आणि जावेदचे वडील गोपीनाथ पिल्लईने हायकोर्टात अर्ज दाखल करुन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन केली होती. या प्रकरणी अनेक पोलिस अधिकाऱ्यांना अटक झाली होती.






