पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – मैत्रिण आपल्यापासून दूर जात असल्याच्या कारणातून तरूणाने तिला धरणाकाठी फिरायला नेऊन डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तरूणाला अटक केली आहे. ही घटना 13 मार्चला भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात घडली होती.
सागर गुंडवे (रा. चांदूर बाजार अमरावती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मनिषा बापूराव गेडाम (वय. 30, रा. मूळ अमरावती) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबबात तरुणीच्या भावाने चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सागर व मनीषा मूळचे अमरावतीचे असून त्यांच्यात महाविद्यालयापासून मैत्रीपुर्ण संबंध होते. शिक्षणानंतर मनीषा पुण्यातील एका नामांकीत मोबाईल कंपनीमध्ये काम करीत होती. ती वडगाव शेरी येथील मुलींच्या वसतिगृहात राहात होती. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ कारणांवरून वादावादी झाली. मनीषा दूर जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सागरच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने मनीषाच्या अमरावतीतील घरी जाऊन तोडफोड केली होती. त्यामुळे मनीषासह तिचे कुटुंबीय सागरवर नाराज होते. त्यानंतर सागर 13 मार्चला पुण्याला आला. त्याने मनीषाला भेटण्याच्या निमित्ताने भाटघर धरणाच्या पाणलोट परिसरात नेले. त्याठिकाणी त्याने मनीषाच्या डोक्यात दगड मारून खून केला.
खून केल्यानंतर सागर पुन्हा मूळ गावी गेला असता चांदूर बाजार पोलिसांनी त्याला एका गुन्ह्यामध्ये अटक केली. दरम्यान, वडगाव शेरीतून बेपत्ता झालेल्या तरूणीचा शोध घेताना चंदननगर पोलिसांनी सागरला चांदूरबाजार पोलिसांकडून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मनीषासोबत मैत्रीपुर्ण संबंध असल्याचे सांगितले. ती दूर जात असल्यामुळेच खुन केल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मानवी हाडांचा सांगाडा, ओढणी, पादत्राणे मिळून आली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील थोपटे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन जाधव यांच्या पथकाने केली.






