पारध पोलिसांची धडक कारवाई : चोरीच्या 14 दुचाकींसह पाच आरोपींना अटक

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत चोरट्यांनी चोरून विक्री केलेल्या तब्बल 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. तसचे पाचही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

शेखर उर्फ आण्णा प्रकाश दांडगे (रा. पिंपळगाव रेणुकाई), विलास रामभाऊ कुऱ्हाडे (रा. हिसोडा), श्रीराम उर्फ बंडू शैलेंद्र जोनवाल (रा. लेहा), तेजराव उर्फ बाबा रामदास जाधव (रा. पिंपळगाव रेणुकाई) आणि गजानन फकिरचंद गोठवाल (रा. जळगाव सपकाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भोकरदन तालुक्यातील या आरोपींना एम. एच. 21, ए- एफ. 9074 या हिरोहोंडा मोटारसायकल चोरी प्रकरणात संभाजीनगर विशेष गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सदरची मोटारसायकल ही पोलीस ठाणे करमाड, ता. जि.संभाजीनगर येथे जप्त करण्यात आलेली आहे. सर्व आरोपी हे भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने अधिक चौकशी पारध पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले.

पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित मोरे यांनी या आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी पारध पोलीस ठाणे हद्दीसह लगतच्या बुलढाणा आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीतून साथीदारांच्या साहाय्याने 14 मोटारसायकली चोरून त्या खेड्या-पाड्यातील लोकांना विकल्याचे कबूल केले. या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल बहुरे, स्था.गु.शा. जालना पोलीस निरीखक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. अभिजित मोरे, पो ना. बी. एम.चौधरी, प्रकाश सिनकर, प्रदीप सरडे, सागर देवकर, शिवाजी जाधव, विकास जाधव, सुरेश पडोळ, दिनेश पायघन, नागरे, वाघ, खरात, रानगोते, भालके,टेकाळे,खेडेकर महिला पोलीस अंमलदार रिठ्ठे या तपास पथकाने पूर्ण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here