लोकलच्या दरवाजात उभे राहण्याच्या वादातून केली प्रवाशाची हत्या

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – लोकलच्या दरवाजात उभे राहण्याच्या वादातून प्रवाशाची हत्या करणाऱयाला रेल्वे गुन्हे शाखा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे पोलिसांनी अवघ्या 48 तासांत बेडय़ा ठोकल्या. फिरोज शेख असे त्याचे नाव असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, तर मृत प्रवाशाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

फिरोज हा मूळचा गोवंडीचा रहिवासी असून तो सध्या वडाळा टी. टी. परिसरात राहतो. सोमवारी रात्री फिरोजने गोवंडी येथून जीटीबी नगर येथे जाण्यासाठी लोकल पकडली. लोकल कुर्ला स्थानकात आल्यावर मृत प्रवासी हा लोकलमध्ये चढला. लोकल चुनाभट्टी ते जीटीबी नगरदरम्यान असतानाच दरवाजात उभे राहण्याच्या वादातून फिरोजचा मृत प्रवाशासोबत वाद झाला. त्यानंतर झालेल्या चाकू हल्ल्यात प्रवासी हा जखमी झाल्यावर फिरोजने जीटीबी नगर येथे उडी मारून पळ काढला.

प्रवाशाच्या हत्येप्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. पोलीस उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक शहाजी निकम, सचिन लोखंडे, हेमराज साठे आदी अधिकाऱयांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजची तपासणीनंतर पोलिसांनी वडाळा टी. टी. परिसरातून फिरोजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here