श्रीनगर – येथील नौगाममध्ये भाजप नेते अन्वर खान यांच्या घरावर गुरुवारी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात तेथे तैनात असलेला एक सुरक्षारक्षक शहीद झाला. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षारक्षकांची रायफलही पळवून नेली आहे. अनवर हे बारामुल्लाचे भाजप जिल्हा सरचिटणीस तसेच कुपवाडा प्रभारी आहेत. या हल्ल्यानंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी या परिसरात सुरक्षा दलांनी घेराबंदी केली आहे.
कश्मीर खोऱयातील नौगामच्या अरीबागमध्ये राहणारे भाजप नेते अन्वर खान यांच्या घरामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करीत दहशतवाद्यांनी आज सकाळी जोरदार हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे गोळीबारात घराबाहेर सुरक्षेवर असलेले रक्षक रमीज राजा शहीद झाले. भाजप नेते अन्वर हल्ल्याच्या वेळेस घरात नव्हते त्यामुळे बचावले.
गेल्या चार दिवसांत राजकीय नेत्यांवर झालेला हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. याआधी सोमवारी सोपोरमध्ये बिडीसी चेअरपर्सन फरीदा खान यांच्या पंचायत कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एका पीएसओसह दोघांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यात जखमी झालेल्या फरीदा खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर पंचायत कार्यालयाला मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.






