जनावर चोरी करणाऱ्या टोळीला मुद्देमालासह अटक; जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जालना शहरातून जनावरे चोरी करुन कत्तलखान्यात विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा जनावरे चोरीच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून जनावर बांधण्यासाठी लागणारे मोठे दोरखंड, एक लालसर रंगाची गाय व एक महिंद्रा पिकअप असा एकूण 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यात व शहरात जनावर चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व प्रतिबंध करण्यासाठी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी सूचना देत आदेश दिले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नियुक्त केले होते. हे पथक जनावर चोरीच्या आरोपींची माहिती घेत होते. 31 मार्च रोजी मध्यरात्रीदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार शहरात गस्त करीत असताना पॉवरलुम परिसराकडून एक संशयीत महिंद्रा पिकअप वाहन वेगात जाताना दिसले.

वाहनांचा रात्र अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करुन महिंद्रा पिकअप गाडीस जुने एम.आय.डी.सी. परिसरात थांबविले. या वाहनामध्ये तीन व्यक्ती होते. त्यांना त्यांची नाव विचारली असता जुनेद अब्बास कुरेशी (रा. सिल्लेखाना संभाजीनगर), जावेद खान नवाज खान (रा. बायजीपुरा संभाजीनगर), रफिक शेख नुर शेख (रा. सिल्लेखाना, संभाजीनगर) अशी नावे सांगितली. पिकअप वाहनांची पाहणी केली असता मागील बाजुस एक गाय दिसून आली. या गायीबाबत जुनेद अब्बास कुरेशी याच्याकडे विचारपूस केली असता ते संभाजीनगर येथून जनावर चोरीच्या उद्देशाने जालना शहरात आले होते. जुनी एमआयडीसी परिसरात एका घरासमोर बांधलेल्या गायीस गाडीत टाकून गायची विक्री व कत्तल करण्यासाठी चोरुन नेत होते, असे सांगितले.

आरोपींकडून जनावर बांधण्यासाठी लागणारे मोठे दोरखंड, एक लालसर रंगाची गाय व एक महिंद्रा पिकअप असा एकुण 4 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गाय मालकाच्या तक्रारीवरुन बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जुनेद अब्बास कुरेशी (रा. सिल्लेखाना, संभाजीनगर) यास इतर जनावर चोरी बाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर वेगवेगळ्या साथीदारासह जालना शहरातून विविध भागातून चोरी करुन त्याने त्याचे साथीदार आरोपी निहाल कैसर कुरेशी, शहाजद उर्फ सज्जु इजाज कुरेशी दोन्ही (रा. सिल्लेखाना, संभाजीनगर) यांना विक्री केल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना संभाजीनगर येथून ताब्यात घेत त्यांच्याकडून गायी कत्तल करुन मांस विक्रीमधून मिळालेली तीन गुन्ह्यातील रक्कम नगदी 1 लाख 2 हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहेत. या आरोपींकडून बाजार, चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणले आहेत. पाचही आरोपींकडून जप्त मुद्देमालासह सदर बाजार येथे कार्यवाहीसाठी देण्यात आलेले आहे.

ही कामगिरी पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक दुर्गेश राजपुत, पोहेकॉ हरिष राठोड, सॅम्युअल कांबळे, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायदे, संजय मगरे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे,संदीप मांन्टे, देविदास भोजने, विलास चेके, रवि जाधव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here