चंद्रपूर – येथील एका शाळेतील शिक्षकानेच विद्यार्थीनीचा विनंयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली असून हितेश मडावी असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. ही घटना समोर येताच शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे. विद्यार्थीनीच्या पालकाने केलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या काळात ऑनलाईन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. यासाठी स्मार्टफोनद्वारे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पालक आपल्या पाल्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देत आहेत. अशातच ग्रामीण भागातील मुली या शहरातील वस्तीगृहात येऊन आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. चंद्रपूर शहरात नामांकित असे शाळा तथा महाविद्यालय आहे. येथील शाळेतही ऑनलाईन पध्दतीने शिक्षण सुरू आहे. याच शिक्षणाचा गैरफायदा घेऊन काही शिक्षक विद्यार्थींनीना त्रास देत आहेत. आरोपी शिक्षक हितेश मडावी याचेकडून ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर एका विद्यार्थीनीला अश्लिल संदेश, अश्लिल फोटो पाठवून त्रास दिला जात होता. एवढेच नव्हे तर फोन करून त्या विद्यार्थीनीला छळत होता.
दरम्यान या शिक्षकाच्या बेताल वागण्याला पीडित विद्यार्थीनीने कोणतीही भिक न घातल्याने दोन शिक्षकांनी रंगपंचमीच्या दिवशी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात जावून चांगलाच धिंगाणा घातला. या घडलेल्या प्रकाराबाबत विद्यार्थीनींनी पालकांना सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पालकांनी शाळेचे मुख्याध्यापकांकडे आणि रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आज गुरूवारी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून आरोपी हितेश मडावी याला अटक केली. चंद्रपूरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडल्याने शिक्षण क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे.






