मल्टीनॅशनल कंपनीतील नोकरीचे प्रलोभन देत पोलीसाच्या पत्नीला सव्वा नऊ लाखांचा गंडा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – मल्टीनॅशनल कंपनीतील नोकरीचे प्रलोभन एका पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला चांगलेच महागात पडले आहे. नोकरी तर मिळालीच नाही, मात्र तब्बल सव्वा नऊ लाख रुपयांवर पाणी सोडण्याची वेळ अधिकाऱ्याच्या पत्नीवर आली आहे. याप्रकरणी, धानोरी परिसरातील एका 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच मोबाईलधारक व्यक्तींच्या विरुद्ध आयटी ॲक्टनुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 1 ते 9 मार्च या कालावधीत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ह्या उच्चशिक्षीत असून, त्यांचे पती देखील मुंबई येथे पोलिस दलात कार्यरत आहेत. फिर्यादींना मुंबई येथील कंपनीत नोकरी हवी होती. त्यासाठी त्यांनी आपला बायोडाटा नोकरी विषयक संकेतस्थळावर अपलोड केला होता. त्याच माहितीच्या आधारे सायबर चोरट्यांनी फिर्यादींच्या मोबाईलवर संपर्क करून करिअर जॉब्स कंपनीतून बोलत असल्याचे सागिंतले. त्यानतंर त्यांची कंपनी मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळवून देण्यासाठी कन्स्टन्सी म्हणून काम करत असल्याची बतावणी करत नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवले. फिर्यादी आपल्या जाळ्यात अडकल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी विविध कारणे सांगून त्यांच्याकडून तब्बल 11लाख 65 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले.

दरम्यान, नोकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी आरोपींकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला. तेव्हा त्यातील 2 लाख 40 हजार रुपये त्यांनी फिर्यादींना परत केले आहेत. मात्र अनेकदा प्रयत्न करून देखील 9 लाख 25 हजार रुपये परत मिळत नाहीत याची खात्री झाल्यानंतर फिर्यादींनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तक्रार अर्जाची चैकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलिस करत आहेत.

मागील काही दिवसांपासून नोकरीच्या आमिषाने फसवणूक होण्याच्या प्रकारात घट झाली होती. शिवाय नागरिकांना देखील सायबर चोरट्यांच्या मोडसची माहिती झाली होती. मात्र मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बेरोजगार तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. याच संधीचा फायदा घेत परत सायबर चोरट्यांनी नोकरीच्या आमिषाने आर्थिक फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे नोकरीच्या बाबतीत संकेतस्थळामार्फत आलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत संपर्क करताना योग्य काळजी घेण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here