मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात शुक्रवार ते सोमवार संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय – नबाब मलिक

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – मागील काही दिवसांत करोनानं अक्षरक्षः थैमान घातल्यानं राज्य सरकारची झोप उडाली आहे. प्रचंड वेगानं होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवेवर ताण येण्यास सुरूवात झाली असून, रुग्णांचे हाल टाळण्यासाठी आणि विषाणू संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाउन संदर्भात चाचपणी सुरू होती. सर्वच क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज लॉकडाउन/ कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत राज्यात करोनाचं संक्रमण रोखण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात उद्यापासून कडक नियम लागू होणार असून, रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असून, दिवसा १४४ कलम लागू (जमावबंदी) असेल, असं मलिक यांनी सांगितलं.

नवाब मलिक म्हणाले, करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. उद्या रात्री (५ एप्रिल) ८ वाजेपासून ही नियमावली लागू होईल. रात्री ८ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदी असेल. इतर वेळी जमावबंदी आदेश लागू असतील. सर्व मॉल्स, रेस्तराँ, बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. होम डिलिव्हरी आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेनं सुरू राहतील. उद्योग संपूर्ण क्षमतेनं सुरू राहणार असून, कामगारांवर बंधनं नसतील. जिथे कामगारांना राहण्याची व्यवस्था असलेली बांधकामं सुरू राहतील. मंडईत निर्बंध नसतील, पण गर्दी कमी करण्यासाठी नियम करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउन असेल. हा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here