मनसेने केली ब्रिटिशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी ठाकरे सरकारची तुलना

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – काही भागांत कठोर निर्बंध लादून कोरोनाची साथ रोखण्याचा प्रयत्न सरकारने केला. मात्र, लोकं ऐकत नाहीत. त्याऐवजी राज्यात एकदम बंद करून हळूहळू सेवा सुरू केल्यास त्याचा फायदा होतो, हा माझा अनुभव असल्याचे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यामुळे राज्यात संपूर्ण लॉकडाऊन अटळ असल्याचे मानले जाते. भाजप, मनसेसह अन्य पक्षांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजवटीची तुलना ब्रिटिशांच्या काळातील रँडच्या राजवटीशी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाइव्हला प्रत्युत्तर म्हणून संदीप देशपांडे यांनीही फेसबुक लाइव्ह केले. यावेळीही त्यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.

१८९७ साली प्लेगची साथ आली त्यावेळी रँड ने लोकांवर कशाप्रकारचे अत्याचार केले याचा अनुभव राज्यातील जनता सध्याच्या काळात घेत आहेत, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. दुसरीकडे, रस्त्यावर उतरून मदत कशी करायची, हे आता मुख्यमंत्र्यांकडून शिकण्याची गरज नाही. कोरोनाच्या काळात मनसे सैनिकांनी अगदी लाठ्या मारणाऱ्या पोलिसांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांना शक्य ती सगळी मदत केली आहे. सरकारकडून काहीही मदत करण्यात आली नाही. कोरोना काळात जम्बो कोव्हिड सेंटर उभारून ओळखीच्या लोकांना काम देणे आणि पैसे वाटणे हेच काम सरकारने केले, अशी गंभीर टीका देशपांडे यांनी शनिवारी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here