पुणे पोलिसांकडून कडक नाकाबंदी, रस्ते निर्मनुष्य

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरात पोलिसांकडून कडक अमंलबजावणी केली जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांकडे विचारपूस करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय विनाकारण भटकंती करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक कारवाईसह वाहनजप्तीवरही भर देण्यात आला आहे. नागरिकांकडून बाजारपेठेतील सर्व व्यवहार सायंकाळी सहापूर्वीच बंद करून सहकार्य केले जात आहे.

करोना साखळी तोडण्यासाठी कालपासून शहरात कडक निर्बध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर व्यापारी पेठ असलेला लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, महात्मा फुले मंडई, तुळशीबाग, शनिपार परिसरातील दुकाने वेळेआधी बंद करण्यात येत आहेत. पोलिसांकडून ध्वनीक्षेपकाद्वारे जनजागृतीला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे सायंकाळी साडेपाचपूर्वीच दुकाने बंद करण्यात येत आहेत. खरेदीसाठी ग्राहकच नसल्यामुळे गजबजलेले रस्ते काही वेळात निर्मनुष्य झाल्याचे दिसून येत आहे. रविवार पेठेतील बोहरी आळी, कापडगंज, नेहरू चौक तसेच नाना, भवानी पेठेतील भुसार बाजारातील दुकाने बंद करून व्यापाऱ्यांकडूनही पोलिसांना सहकार्य केले जात आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी साडे पाचनंतर पोलिसांची वाहनांतून पेट्रोलिंग करण्यात येत आहे.

कडक निर्बधांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून महत्वाच्या चौकात तात्पुरते तपासणी नाके उभे केले आहेत. विशेषतः बाजीराव रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक, दांडेकर चौक, सिंहगड रोड, डेक्कन, शिवाजीनगर, नळस्टॉप, हडपसर, पुणे स्टेशन परिसर, लष्कर भागासह उपनगरांमध्ये तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here