औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून तिला विहिरीत ढकलून देत जीवे मारल्याची घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे शनिवारी 3 मार्चला घडली आहे.
या प्रकरणी पती मनोहर पाटीलबा भोपळे याला टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की हनुमंत खेडा येथील मनोहर भोपळे यांनी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन ता. 3 मार्चला शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हनुमंतखेडा शिवारातील पांढरी नामक शेतात गोठ्या जवळ पत्नी अनिता मनोहर भोपळे (36) हिच्या पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेतच पत्नीला उचलून विहिरीत फेकून दिले.
या प्रकरणी आरोपी मनोहर भोपळे यांचा मुलगा सतीश भोपळे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चार तासाच्या आत आरोपीला जाफराबाद बसस्थानकावरून पळून जात असताना पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.
सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन, ज्ञानेश्वर साखळे, पंडित गवळी, गजानन काकड, गजेंद्र भुतेकर, धनंजय जगदाळे, प्रदीप धोंडगे, हरी क्षीरसागर यांनी आरोपीचा शोध घेत रात्री साडेअकरा वाजता जाफराबाद बस स्थानकातून ताब्यात घेतले दरम्यान रविवारी सकाळी भोकरदनचे उपविभागीय अधिकारी इंद्रसिंग बहुरे यांच्यासह क्राईम ब्रांचचे एपीआय राहुल शेजाळ, गणेश वाघ, फॉरेन्सिक लॅबचे रवी खलसे, श्वान पथकातील स्वान लीली यांच्यासह संजय कुणाल वाल, सचिन पल्लेवड यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला मुलाच्या फिर्यादीवरून ती त्याचा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ज्ञानेश्वर साखळे करीत आहेत.






