शिंदखेडा (प्रतिनिधी) – चालु वर्षी धुळे जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर गहु, मका व ज्वारी या पिकाची लागवड केली होती. मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर गहु, मका व ज्वारीचे उत्पन्न आले. परंतु बाजारात हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते.
सदर बाबींची दखल घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री श्री. दादा भुसे यांचेकडे गहु, मका व ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरु होणेबाबत पाठपुरावा केला होता. त्याला यश येऊन नुकतीच शासनाने गहू, मका व ज्वारी हमीभाव खरेदी करण्यांस मान्यता दिली असून शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघात जाऊन दि. 30 एप्रिल 2021 पर्यत नांवे नोंदवावीत. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नांवे नोंदवावीत. नोंदणी करतांना आधारकार्ड, पिकपेरा असलेला 7/12 उतारा व बँकेचे पासबुक सोबत आणावे.
शेतकऱ्यांनी 30 एप्रिल 2021 पर्यंत नावे नोंदविल्यानंतर खरेदी प्रक्रिया दि. 1 मे 2021 ते दि. 30 जून 2021 पर्यंत राबविण्यात येणार असून शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा फायदा घ्यावा. नांव नोंदणी करतांना कोविड-19 परिस्थिती असल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे, असे आवाहन पत्रकान्वये शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांनी केले आहे.






