देशात सर्वाधिक लसींचा पुरवठा महाराष्ट्राला होतोय – फडणवीस

मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर)-आरोग्यमंत्र्यांनी राजकारण करणे थांबवावे. देशात लसींचा सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला होतोय. राजेश टोपे यांनी ३ दिवस पुरेल इतका लसींचा साठा शिल्लक आहे असे सांगितले होते. त्यावर उत्तर देताना विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी सरकारला खडे बोल सुनावले. लसीकरणाबाबबत केले जात असलेले आरोप चुकीचे आहेत,. मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांनी चुकीचे आरोप करू नयेत आणि लोकांच्या जीवाशी खेळू नये, असे फडणवीस यांनी सरकारला सुनावले.

महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांसाठी पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यासोबतच, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईत ३ दिवसांचाच लसींचा साठा शिल्लक असून केंद्र सरकार महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. “लसीकरणाबाबत केले जात असलेले आरोप चुकीचे असून राज्य सरकारमधील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं बंद करावं, लोकांच्या जिवाशी खेळू नये”, असं फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या दाव्यानंतर राज्यातल्या लसीकरण कार्यक्रमाचं काय होणार? यावर चर्चा सुरू झाली होती. लसींचा पुरवठा कमी पडल्यास राज्यातील लसीकरणामध्ये खंड पडेल की काय? अशी देखील शंका उपस्थित केली जाऊ लागली होती. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उलट राज्य सरकारवरच निशाणा साधला आहे.

“लसीकरणाबाबतचा आरोप चुकीचा आहे. मुळातच आपली लसीकरणाची क्षमता आणि टार्गेट ग्रुपला आवश्यक लसींचा पुरवठा आपल्याकडे नियमितपणे होत असतो. लसींचा देशभरात पुरवठा होत आहे. देशात सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. तीन दिवस पुरेल एवढा साठा संपायच्या आत पुढचा साठा येतो. रोज साठा येत असतो. आपल्याला काही लसींची साठेबाजी करायची नाहीये”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here