युवकाच्या मृत्यूप्रकरणी रुग्णवाहिकाचालकावर गुन्हा दाखल

अकोला (प्रतिनिधी) – उपचारासाठी रुग्णाला घेवून जात असताना १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेचा टायर पंचर झाल्यानंतर पर्यायी टायर उपलब्ध नव्हता. तर पर्यायी दुसरी रुग्णवाहिका यायला दोन ते अडीच तास उशीर झाल्याने युवकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार संबधित रुग्णवाहिकेच्या चालकासह जिल्हा व्यवस्थापकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अकोट तालुक्यातील वणीवारुळा येथील रोशन निरंजन पळसपगार (वय १९) हा युवक आजारी असल्याने अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आला होता. तेथे त्याची तब्येत आणखीच गंभीर झाल्याने ग्रामीण रुग्णालयाने १०८ रुग्णवाहिकेतून (क्र. एमएच १४ सीएल ०८१३) त्याला अकोलाला पाठविले. रोशन याला घेवून रुग्णवाहिका पळसोद फाटाजवळ आल्यावर रुग्णवाहिकेचे मागील टायर पंचर झाले. यावेळी रुग्णवाहिकेमध्ये पर्यायी टायर उपलब्ध नव्हते. दुसरी रुग्णवाहिका यायला तब्बल दोन ते अडीच तास वेळ लागला. या दरम्यान उपचारास विलंब झाल्याने रोशनचा रुग्णवाहिकेत मृत्यू झाला.

या घटनेची माहिती प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष निखिल गावंडे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्या निदर्शनात आणून दिली होती. दरम्यान पालकमंत्री बच्चू कडू यांनी तत्काळ दोषींवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले. अकोट येथील वैद्यकीय अधीक्षक मंगेश लक्ष्मण दातीर यांच्या तक्रारीनुसार, चालक ऋषिकेश निमकर, जिल्हा व्यवस्थापक व भारत विकास ग्रुप यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास दहिहांडा ठाणेदार प्रकाश अहिरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here