कोटींच्या खंडणीचे आरोप करणार्‍यांची संपत्तीही कोटीत

मुंबई (प्रतिनिधी) – सचिन वाझे प्रकरणात अडकलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर शंभर कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप केला आहे. या प्रकरणाशी संबंधितांची संपतीही कोटीत असून वाझे यांना इतरांपेक्षा कमी पगार असला, तरी त्यांची संपत्ती मात्र इतरांपेक्षा जास्त दिसते. हरयाणामध्ये परमबीर सिंह यांच्याकडे शेतजमीन आहे. सध्या त्याची किंमत 22 लाख रुपये आहे. यातून त्यांना 51 हजारांचे वार्षिक उत्पन्न मिळते. 2003 मध्ये त्यांनी मुंबईच्या जुहू भागात 48.75 लाख रुपयांमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. सध्या त्याचे मूल्य 4.64 कोटी आहे. यातून वार्षिक उत्पन्न 24.95 लाख रुपये होते.

जुहूमध्येच आणखी एक मालमत्ता आहे; मात्र त्यांनी त्याची किंमत दिलेली नाही. परमबीर सिंह यांचे मासिक वेतन दोन लाख 24 हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबईत 3.60 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. स्थावर मालमत्तांची किंमत वाढत असते; परंतु तीन कोटी साठ लाखांना खरेदी केलेल्या सदनिकेची किंमत त्यांनी दोन कोटी 24 लाख रुपये दाखविली आहे. ही सदनिका त्यांच्या पत्नी सविता सिंह यांच्या नावावर आहे. चंदीगडमध्ये त्यांचे एक घर असून त्याची किंमत चार कोटी आहे. हे त्यांच्या आणि त्यांच्या दोन भावांच्या नावावर आहे.

हरयाणाच्या फरिदाबाद येथे त्याच्या मालकीची जमीन आहे. त्याची सध्याची किंमत 14 लाख रुपये आहे. परमबीर सिंह यांच्या पत्नी आणि मुलगा वेगवेगळ्या संस्थांचे संचालक आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे 7.16 कोटींची संपत्ती आहे. निवडणुकीदरम्यान दाखल केलेल्या कागदपत्रांवरून ही माहिती मिळते. त्यात 27 लाख रुपयांची शेती आहे. बिगर शेत जमिनीची किंमत 12 लाख 54 हजार रुपये आहे. एक व्यावसायिक इमारत आहे, जिची किंमत एक कोटी 64 लाख रुपये आहे. त्यांचा मुंबईतील वरळी आणि नवी मुंबई भागात एक-एक फ्लॅट आहे, ज्याची किंमत तीन कोटी 53 लाख रुपये आहे. 2002 मध्ये त्यांनी वरळीचा फ्लॅट 55 लाखात खरेदी केला होता, तर नवी मुंबईचा फ्लॅट 2013 मध्ये 23 लाखांत खरेदी केला होता. यात त्यांच्या पत्नीचे नावही आहे.

त्याचप्रमाणे त्याच्याकडे अन्य जमिनींमध्ये 1.59 कोटींची जमीन आहे. ही जमीन त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर आहे. त्यांच्या नावावरील मालमत्तेची एकूण किंमत सध्या तीन कोटी सात लाख कोटी रुपये आहे आणि पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेची किंमत चार कोटी आठ लाख रुपये आहे. अटक करण्यात आलेला सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेच्या 3 कंपन्या आहेत. यात मल्टीबिल्ड इन्फ्राप्रोजेक्ट, टेक्निकल सोल्यूशन्स आणि डीजी नेक्स्ट मल्टीमीडिया आहेत. त्यांच्या पार्टनरमध्ये दोन शिवसेनेचे नेते आहेत. संजय माशेलकर आणि विजय गवई अशी त्यांची नावे आहेत.

वाझेंकडे आठ वाहने आहेत. तसेच, इटालियन बेनेल्ली कंपनीच्या स्पोर्ट्स बाईकची किंमत सुमारे 7-8 लाख रुपये आहे. आठ लक्झरी कार आणि एका बाईकची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. ठाण्यात ते राहतात त्या फ्लॅटची किंमतही एक कोटी असल्याचे सांगितले जात आहे. सचिन वाझेचे मासिक वेतन सुमारे 70 हजार रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here