शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) – राहाता तालुक्यातील कोविड सेंटर, औषध दुकाने तसेच कोरोना चाचणी केंद्रात सुरु असलेला अनागोंदी कारभार व आर्थिक लुटमार याची चौकशी होऊन दोषीवर तातडीने कारवाई केली जावी. राहाता तालुक्यातील किमान दहा मेडीकलमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
याबाबत तहसीलदार कुंदन हिरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राहाता तालुक्यातील कोरोना खाजगी सेंटरमध्ये शासनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. या ठिकाणी रुग्णास उपचारासाठी भरती केल्यास सर्व जबाबदारी सेंटरची असताना रुग्ण व नातेवाईक यांना वेठीस धरले जाते. बाहेरुन औषधे आणण्यास सांगितले जात असल्याने औषध दुकानामधील काळाबाजार वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अन्न औषध प्रशासाने श्रीरामपुर, संगमनेर, कोपरगाव, नगर शहर व तालुका, जामखेड तसेच इतर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसीवीर या इंजेक्शनची उपलब्धता करुन देण्यासाठी दहा किंवा त्यापेक्षा अधिक औषध दुकांनांना पुरवठा केला आहे. राहाता तालुक्यात फक्त प्रवरा हॉस्पिटल या एकाच ठिकाणी इंजेक्शन उपलब्ध करुन दिले असा आक्षेप चौगुले यांनी घेतला आहे. तालुक्यातील काही औषध दुकानात रेमडेसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत आहे. खाजगी कोविड सेंटरमध्ये दरपत्रक दिसेल अशा ठिकाणी न लावता आडबाजुला बारीक अक्षरात लावले आहेत. रुग्णांकडुन बिलांची मनमानी आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत.
शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारले जातात. शिर्डीचे कोविड सेंटर फुल झाले आहे. त्यामुळे शिर्डीसाठी साधारण पणे दररोज २०० इंजेक्शन तर १०० इंजेक्शन राहाता आणि परिसरासाठी आवश्यक आहे. तरी पण शिर्डीच्या कोणत्याही मेडिकलचे यात नाव नाही ही आश्चर्याची बाब आहे. या सर्व बाबींची चौकशी करुन दोषीवर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकरारी अहमदनगर, उपायुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पाठविल्या आहेत.






