अहमदाबाद – संपूर्ण देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेननं धुमाकुळ घातला आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनाच्या लसीचा तुटवडा भासत आहे. देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. सरकारनं केलेल्या दाव्यानुसार हे इंजेक्शन सध्या स्टॉकमध्ये नाही. दरम्यान गुजरातच्या एका पक्ष कार्यालयात लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन मोफत दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर विरोधी पक्षांनी भाजपच्या नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.
गुजरातचे भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी दावा केला आहे की, भाजप कार्यालयात ५ हजार रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना संक्रमित लोकांच्या नातेवाईकांना दिलं जात आहे. यावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. जर रेमडेसिविर स्टॉकमध्येच नाही तर भाजपच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात आली कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जर लसीकरणाची संपूर्ण जबाबदारी केंद्राकडे आहे तर एखाद्या पक्षाच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर कसं काय मिळू शकतं? याबाबत जाब विचारला जात आहे. दरम्यान सुरतमध्ये भाजपच्या मुख्य कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी लोकांनी सोशल डिंस्टेंसिंगसुद्धा पाळले नाही. गुजरातचे भाजप अध्यक्ष यांनी लोकांना पाच हजार इंजेक्शन मोफत देण्याची घोषणा केली त्यामुळे ही इंजेक्शन्स लोकांना त्यांच्या कार्यालयातून नेण्यास सांगितले होते, अशी चर्चा आहे.






