नंदुरबार पोलिसांचा अवैध गुटखाविक्रीला चाप; प्रकाशाजवळ ३३ लाखांचा गुटखा जप्त

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना राजरोसपणे सर्वत्र गुटखा विक्री होत असल्याच्या बातम्या याआधीच प्रसारित झाल्या होत्या नंदुरबार जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट मथळ्याखाली बातमी प्रसारित केली होती यामुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले असून येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत प्रकाशा गावाजवळ 33 लाख 30 हजार 400 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.

याविषयी मिळालेली अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे शहादा पोलीस हद्दीत रात्रीच्या गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाने शिताफिने कारवाई करत लाखो रुपयांचा गुटखा पानमसाला जप्त केला आहे. रात्रीच्या सुमारास साडेतीन वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार मुकेश तावडे व बापू बागूल यांच्या पथकाने शहादा -तळोदा रस्त्यावरील प्रकाशा येथील आप्पाचा ढाब्याजवळ टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम पी 09 एच एफ 8563 याला थांबून चौकशी केली असता प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये गुटखा पानमसाला असल्याचे आढळून आले.

अधिक चौकशी केली असता सदर मुद्देमाल गुजरात राज्यातून कृष्णा ट्रेडर्स वापी येथून बर्‍हाणपूर येथील नवीन ट्रेडर्स यांच्याकडे जात असल्याची माहिती ट्रक ड्रायव्हरने दिली. महाराष्ट्र व गुजरात सीमेवर कडक बंदोबस्त असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी केली जात आहे हे विशेष .प्लास्टिकचे दाणे भरलेल्या गोण्या या ट्रकमध्ये लादलेल्या होत्या व या गोण्यांवर खाकी रंगाच्या 40 गोण्यांमध्ये 15 लाख 55 हजार 840 रुपये किमतीचा विमल पान गुटखा व पांढऱ्या रंगाच्या 8 गोण्यांमध्ये 2 लाख 74 हजार 560 रुपये किमतीचा व्ही-वन तंबाखू आढळून आला आहे तसेच 15 लाख किमतीचा ट्रक असा एकूण 33 लाख 30 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिस प्रशासनाकडून जप्त करण्यात आला आहे .

याप्रकरणी पोलिस विभागाकडून भादवि कलम 188 ,272 ,273 सह अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक ड्रायव्हर साबीर शेख गब्बु शेख व त्याचा साथीदार इरफान खान इक्बाल खान दोघे राहणार भौरोसा मध्यप्रदेश यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here