मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता बेडची कमतरता जाणवत आहे. दिवसाला १० हजाराच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. अनेक जण बेड अडवून ठेवत असल्याची महिती समोर येत आहे. त्यामुळे रुग्णांसाठी बेड मिळवताना नातेवाईकांची दमछाक होत आहे. त्यामुळे रुग्णाना बेड मिळवून देण्यासाठी आता महापालिका कठोर पावले उचलणार आहे. कोरोना रुग्णाना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे आता महापालिकेकडून कृती कार्यक्रम तयार केला जात आहे, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
आता प्रत्येक वॉर्डसाठी दोन नोडल अधिकारी असतील. हे अधिकारी दुपारी ३ ते ११ आणि रात्री ११ ते ७ या वेळेत काम पाहणार आहेत. त्यामुळे सायंकाळी ७ ते रात्री ७ वाजेपर्यंत रुग्णाना आणि त्यांच्या नातेवाईकांना जी वणवण करावी लागते ती थांबणार आहे. योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळायला मदत होणार आहे.
बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांकडून १९१६ नंबरवर कॉल केला जातो. मात्र अनेकांना तो कॉल व्यस्त येतो, त्यामुळे मुंबईकरांनी वॉर रूममध्येच कॉल करावा, जेणेकरून वॉर रूम आणि नोडल अधिकारी बेड मिळवून देण्यासाठी मदत करतील, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.






