मुंबई (प्रतिनिधी संदेश काटकर) -वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी सरकार कडक टाळेबंदी लागू करण्याची शक्यता असली तरी टास्क फोर्सच्या तज्ज्ञांमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाच्या म्हणण्यानुसार टाळेबंदीचा आता काहीच उपयोग नाही. उलट टाळेबंदी केल्यास कोरोना वाढेल, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या एका डॉक्टरांच्या गटाचे म्हणणे आहे कि, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदी हाच एकमेव पर्याय आहे. तर राज्याच्या कृती दलाचे प्रमुख संजय ओक यांचे म्हणणे आहे कि, जनताच टाळेबंदी करायला सरकारला भाग पडत आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने करोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिवसा जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. शनिवार – रविवार टाळेबंदी करून पाहिली तरीही लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. वारंवार सांगूनही लोक मास्क वापरत नाहीत, गर्दी टाळत नाहीत तसेच अनावश्यक फिरत आहेत. परिणामी करोना वेगाने आपले हातपाय पसरत चालला आहे. राज्यात गेले आठवडाभर रोज ५० हजाराहून अधिक करोना रुग्ण सापडत आहेत तर दोनशे-तीनशे लोकांचे मृत्यू होत आहेत. मुंबईतही रोज दहा हजाराच्या आगेमागे रुग्ण सापडत असून राज्यात बेड मिळण्यासाठी अक्षरश: रुग्णांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने केंद्र शासनाकडे ऑक्सिजन तसेच व्हेंटिलेटरची मागणी केली असून केंद्राकडून पुरेशा लसी मिळत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे म्हणणे आहे. या लस पुरवठ्यावरून आता राज्य सरकार व केंद्रातील नेत्यांमध्ये राजकीय नाट्य रंगू लागले असतानाच करोना आटोक्यात येण्याची काही चिन्हे दिसत नसल्यामुळे राज्य सरकारने कडक टाळेबंदीचा इशारा देत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.
या पार्श्वभूमीवर खासगी व शासकीय डॉक्टरांची कडक टाळेबंदीबाबत भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता बहुतेक डॉक्टरांनी या विषयावर न बोलणे पसंत केले. काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर टाळेबंदी योग्य नसल्याचे तसेच जास्त नुकसान करेल असे मत व्यक्त केले. एका डॉक्टरच्या म्हणण्यानुसार मध्यंतरी अकोला व अमरावतीमध्ये पंधरा दिवस टाळेबंदी लागू करूनही तेथे काहीही उपयोग झाला नव्हता. उलट करोना वाढतच गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे राज्याचे आर्थिक कंबरडे पूर्ण मोडले आहे. हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था अधिक वाईट होण्यापलीकडे टाळेबंदीमधून काहीच साध्य होणार नाही. टाळेबंदीला शास्त्रीय आधार काय, असा सवालही एका डॉक्टरने केला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी आरोग्य महासंचालक व राज्याचे प्रमुख करोना विषयक सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी करोना रोखण्यासाठी आज टाळेबंदीला दुसरा पर्याय काय आहे असा सवाल करत टाळेबंदी लागू झाली पाहिजे, अशी सुस्पष्ट भूमिका मांडली. राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. गोरगरीब लोकांचे हाल होणार हे मान्य आहे पण त्याहीपेक्षा आज लोकांचे जीव वाचणे जास्त महत्वाचे आहे, असे डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले.






