गांधी पुतळ्याजवळील आंदोलनात ममता बॅनर्जी एकट्याच

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ दरम्यान राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगानं २४ तासांची प्रचारबंदी लागू केलीय. या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी यांनी आंदोलन सुरू केलंय.या दरम्यान तृणमूल काँग्रेसचे कोणतेही नेते किंवा समर्थक त्यांच्यासोबत नव्हते. ‘आंदोलनस्थळी कुणालाही जाण्यासाठी परवानगी नाही. त्यामुळे त्या एकट्याच आंदोलनाला बसल्याचं’ तृणमूलच्या नेत्यांनी म्हटलंय.

निवडणूक आयोगाचा हा निर्णय ‘असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी’ असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय. गेल्या महिन्यात जखमी झालेल्या ममता बॅनर्जी अजूनही व्हिलचेअरवर आहेत. आज सकाळी ११.३० वाजल्याच्या सुमारास त्या मायो रस्त्यावर पोहचल्या आणि या परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ त्यांनी धरणं आंदोलन सुरू केलं.

केंद्रीय दलाविरुद्ध केलेलं वक्तव्य तसंच धार्मिक प्रवृत्तीच्या एका वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जींविरोधात कारवाई करत त्यांच्यावर २४ तासांची प्रचारबंदी घातली आहे. ‘निवडणूक आयोगाच्या लोकशाहीविरोधी आणि असंवैधानिक निर्णयाविरोधात मंगळवारी १२ वाजल्यापासून कोलकात्यात गांधी मूर्तीजवळ धरणं आंदोलन सुरू राहील’ असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं होतं.

ममता बॅनर्जी ज्या भागात आंदोलनाला बसल्या आहेत तो भाग सेनेच्या ताब्यात असल्यानं तृणमूलच्या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती सेनेच्या एका अधिकाऱ्यानं दिलीय. मंगळवारी रात्री ८.०० वाजता बारासात आणि बिधाननगर या भागात आयोजित करण्यात आलेल्या दोन रॅलीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here